
तब्बल पाच खर्व म्हणजे १० हजार कोटी रुपयांचा खजिना तळघरात सापडल्याने केरळातील पद्मनाभस्वामी मंदिराने अख्ख्या जगाचे डोळे दिपवले आहेत. पण ती सारी संपत्ती भक्तांनी श्रद्धेपोटी दिलेल्या देणग्या आणि भेटींतून उभी राहिलेली नाही तर लोकांनी रक्त आटवून, घाम गाळून मिळवलेल्या कमाईची बेबंदपणे केलेली ती लूट आहे, हे आता उघड झाले आहे. त्यामुळे पद्मनाभस्वामींचा खजिना हा ‘शापित संपत्ती’ ठरली आहे.
थिरुवनंतपुरम येथील पद्मनाभस्वामी मंदिराचा इतिहास तेथील ग्रंथालयाच्या पानोपानी उपलब्ध आहे. १५व्या शतकात त्या मंदिराचा खजिना दौलतीने ओसंडून वाहू लागला. त्यामागे दडलेल्या लोकांच्या पिळवणुकीच्या कहाण्या आता बाहेर येऊ लागल्या आहेत. मार्तंड वर्मा यांच्या त्रावणकोर संस्थानात जाचक कर आणि दंड आकारणीने कहरच केला होता. महिलांनी तान्ह्या बाळाला स्तनपान करण्याबरोबरच पुरुषांना ओठावर मिशी ठेवण्यावरही कर आकारला जात होता.
लग्न, जन्म, मृत्यू अशा प्रसंगांसोबतच होडी, नांगर, बैलगाडी, छत्री अशा नेहमीच्या वापराच्या वस्तूंच्या मालकीवरही कर आकारला जात असे. विशेष म्हणजे, कनिष्ठ जातींवर जादा कराची लादवणूक केली जायची.
या अमानुष करआकारणीविरुद्ध पहिले बंड मथुर पन्नीकर या खंड प्रमुखांच्या काळात एका बाळंतीणीनेच केले. कर न भरता स्तनपान करण्यास प्रतिबंध करताच तिने स्वत:चे स्तन कापून टाकून ते खंडप्रमुखाच्या पायावर टाकले होते.
राजा ‘जुलमी’ झाला!
त्रावणकोरमध्ये राजा मार्तंड वर्मा याच्याआधी पद्मनाभस्वामी मंदिरावर अधिराज्य होते ते नायर मंडळींचे. संस्थानातील आठही खंडांत हुकूमत चालवलेल्या नायर कुटुंबांनी राजा मार्तंड याला ठार मारण्याचा प्रयत्नही केला होता. राजाला पळून जाऊन जीव वाचवावा लागला होता. नंतर मात्र त्याने शेजारच्या राजा-महाराजांची मदत मिळवून सैन्य उभे केले आणि आठही खंडांतील नायरांचा खात्मा केला. त्रावणकोरचे संस्थान हाती आल्यानंतर राजा मार्तंड वर्मा याने सत्ता कायम राखण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून पद्मनाभस्वामी मंदिरालाच ‘ढाल’ बनवले. त्याने आपले सिंहासन आणि मुकुट स्वामींना बहाल करून टाकत स्वत:ला ‘पद्मनाभदास’ म्हणून घोषित केले. त्याचा अपेक्षित परिणाम झाला. मार्तंड वर्माच्या साम्राज्यावर हल्ला करण्याऐवजी शेजारचे राजे पद्मनाभस्वामी मंदिराचे ‘दाते’ बनले. अशाप्रकारे आपले साम्राज्य निर्धोक बनवल्यानंतर मार्तंड वर्मा हा जुलमी राजा बनला
No comments:
Post a Comment